पीएम स्वनिधी योजनेत कर्ज वितरणाच्या लक्ष्य पूर्तीसाठी सगळ्यांनी कसून मेहनत करावी

केंद्र सरकारच्या पीएम स्वनिधी योजनेच्या लक्ष्यपूर्तीसाठी येणारा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या सहकार्याने पीएम स्वनिधी योजनेत फेरीवाल्यांना सर्व बँकांनी विना विलंब कर्ज वितरण करावे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रासाठी फेरीवाल्यांकरता असलेल्या पीएम स्वनिधी योजनेचे ३६८३० जणांना कर्ज वितरण करण्याचे सुधारित उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत २६५८२ एवढे म्हणजे ७२.१७ टक्के उद्दिष्ट गाठलेले आहे. येत्या आठ दिवसांत आणखी १०२४८ जणांना कर्ज वितरीत करायचे आहे. याचा आढावा घेण्यासाठी आयुक्त बांगर यांनी महापालिका क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका आणि सहकारी बँका यांच्या प्रतिनिधींची बैठक गेल्या आठवड्यात घेतली. कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढील एक आठवड्याचा कालावधी महत्त्वाचा आहे. त्यामुळे कर्जासाठी मंजुरी देणे, कर्जाचे वितरण करणे ही कामे जलद गतीने केली जावीत. त्यात येणाऱ्या अडचणीचा दैंनदिन स्वरूपात आढावा घेऊन ते अर्ज निकाली काढावेत असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. कर्ज मंजूर झाले पण वितरीत झाले नाही, तसेच, कर्ज मंजूर झाले पण ती व्यक्ती पुढील कार्यवाहीसाठी आली नाही, अशा स्वरूपाच्या अडचणींबाबत सर्व सहायक आयुक्त यांनी बँक आणि समाज विकास विभाग यांच्याशी समन्वय ठेवावा, असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading