परराज्यातील हरवलेल्या दोन मुली महिनाभराच्या आत त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यास पोलीसांना यश

परराज्यातील हरवलेल्या दोन मुली महिनाभराच्या आत त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यास पोलीसांना यश आलं आहे. १७ वर्षीय शनिचरण आणि ४ वर्षीय शनिया या दोन बहिणी चुकून उत्तरप्रदेशातून मुंबईला येणा-या ट्रेनमध्ये बसल्या. शनिचरण ही तरूणी मनोरूग्ण आहे. या दोघी ठाणे रेल्वे स्थानकात बेवारस फिरताना पाहून कोपरी पोलीसांनी त्यांची विचारपूस केली. पण या दोघींना स्वत:बद्दल काही सांगता येत नव्हतं. त्यामुळं त्यांच्या पालकांचा शोध होईपर्यंत त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी मुख्य न्यायदंडाधिकारी राजेंद्र तांबे यांच्यासमोर हजर करण्यात आलं. त्यांनी शनिचरणला मनोरूग्णालयात उपचारार्थ तर लहान असलेल्या शनियाला डोंबिवलीतील आशिष संस्थेत ठेवण्याचे आदेश दिले आणि पोलीसांना दोन्ही मुलींच्या पालकांचा शोध घेण्याचे आदेश दिले. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र दौंडकर यांनी भोजपुरी भाषेची माहिती असलेल्या महिलेची मदत घेऊन शनिचरणची चौकशी केली. तिच्याकडून मिळालेल्या अपु-या आणि त्रोटक माहितीच्या सहाय्यानं तिच्या पालकांचा शोध लावला. तिचे पालक कमलेश राय यांच्याशी संपर्क साधून या मुलींना त्यांच्या ताब्यात देण्यात आलं. या मुली आपल्या आत्याकडे रहायला गेल्या होत्या. पण घरी येताना त्या थेट ठाण्यात आल्याचं निष्पन्न झालं. मुख्य न्यायदंडाधिकारी राजेंद्र तांबे यांनी वैयक्तीक लक्ष घालून पोलीस यंत्रणेला तपासाचे आदेश दिले तसंच स्वखर्चाने नवीन कपडे आणि जीवनावश्यक वस्तू घेऊन दिल्या. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

Leave a Comment

%d bloggers like this: