पत्रकार संरक्षण कायद्यासह विविध मागण्यांसाठी आज पत्रकार रस्त्यावर उतरले होते. जिल्ह्यातल्या पत्रकारांनीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. ठाणे जिल्हा पत्रकार संघ आणि शहर दैनिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमानं शासकीय विश्रामगृहासमोर निदर्शनं करत धरणं धरण्यात आलं. यावेळी पत्रकार संघाच्या वतीनं जिल्हाधिका-यांना एक निवेदन देण्यात आलं. पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी, पत्रकारांसाठी निवृत्ती योजना सुरू करावी, जिल्हा पत्रकार भवन प्रकरणात कारवाई करावी, छोट्या वृत्तपत्रांचे अस्तित्व संपवून टाकणारे जाहिरात धोरण मागे घ्यावे, अधिस्विकृती बाबतच्या जाचक अटी शिथील कराव्यात, मजीठिया आयोगाची अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्यांसाठी ही निदर्शनं करण्यात आली. यावेळी पत्रकारांच्या मागण्या मान्य करण्याकरिता सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
