ठाण्याची खाडी हळूहळू प्रदूषणमुक्त होत असून निर्माल्य विरहीत ठाणे खाडीमध्ये चक्क प्रतिबिंब दिसू लागलं आहे. वाहत्या पाण्यामध्येच निर्माल्याचं विसर्जन करण्याचा अनेकांचा अट्टाहास असला तरी ठाणे खाडीत आपल्या निर्माल्यामुळं प्रदूषण वाढू नये याची काळजी ठाणेकर घेत आहेत आणि त्याचे परिणाम आता खाडीत दिसू लागले आहेत. रासायनिक पदार्थ अथवा विषारी द्रव्य घटक पाण्यामध्ये विरघळून जातात किंवा तळाशी जाऊन कुसतात. त्यामुळं जलप्रदूषणाचा धोका निर्माण होतो. ठाणे खाडीतही असंच जल प्रदूषण वाढत असून पाण्यातील प्राणवायूच्या कमतरतेमुळं जलचरांवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. खाडी संवर्धनाबाबत आपला खारीचा वाटा असावा या उद्देशानं गणेशोत्सवाच्या काळात बहुतांश भाविकांनी खबरदारी घेत निर्माल्यापासून खत निर्मितीला पसंती दिल्याचं चित्र दिसत आहे. यापूर्वी विसर्जनानंतर खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माल्य तरंगताना दिसत असे. मात्र यावर्षी असा तरंग दिसला नसल्यामुळं ठाणेकरांनी खाडी संवर्धनाबाबत जनजागृती दाखवली आहे. निर्माल्य पाण्यात विसर्जन केल्यावर फुलं, पानं, दुर्वा अशा वस्तू माशांसाठी खाद्य बनू शकतात असा समज असतो. मात्र खाडीतील निर्माल्य हे माशांसाठी अपायकारक आहे. त्यामुळं निर्माल्य पाण्यात सोडण्याऐवजी ते खत निर्मितीसाठी द्यावं या संकल्पनेचं भाविकांनी स्वागत केलं आहे. अनेक गणेश भक्तांनी गणपती विसर्जन करण्यापूर्वी निर्माल्य खत निर्मितीसाठी दिलं आहे. त्यामुळं यंदा प्रथमच ठाणे खाडीत निर्माल्याचे तरंग दिसलेले नाहीत. अगदी तुरळक ठिकाणी निर्माल्य आढळून आलं. त्यामुळं यंदा प्रथमच लख्ख प्रकाशात पाण्यामध्ये आजूबाजूचं प्रतिबिंब पहायला मिळालं. सध्या ठाणेकर खाडीतील ही दुर्मिळ नजाकत पाहण्याचा आनंद लुटत आहेत.
