नापास होण्याच्या भीतीनं घरातून पळून गेलेल्या युवकाचा ४ वर्षानंतर पोलीसांनी लावला छडा

नापास होण्याच्या भीतीनं घरातून पळून गेलेल्या १९ वर्षीय सुमेध चंद्रा या युवकाचा ४ वर्षानंतर पोलीसांनी छडा लावला आहे. पोखरण येथे राहणारा सुमेध चंद्रा हा नववीत नापास झाल्यानंतर वडील रागावतील म्हणून मार्च २०१५ मध्ये घर सोडून निघून गेला होता. त्याच्या घरच्यांनी वर्तकनगर पोलीसांकडे तक्रार नोंदवली होती. गेल्या ४ वर्षापासून ठाणे पोलीस सुमेधचा शोध घेत होते. सुमेध घर सोडून पळून गेल्याची माहिती एका युवकाला मिळाली होती. याच संधीचा फायदा घेत एप्रिल २०१५ मध्ये या तरूणानं आपल्या दोन सहका-यांसह सुमेधच्या वडीलांना फोन करून सुमेधची सुटका करण्यासाठी १ लाखांची खंडणी मागितली होती. काही दिवसांपूर्वी सुमेध यानं नेरूळमधील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडल्याची माहिती अनैतिक मानव वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र दौंडकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीसांनी या बँकेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधून सुमेधला काही कारणासाठी बँकेत बोलवून घेतले. सुमेध बँकेत येताच पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आणि पालकांच्या स्वाधीन केले अशी माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवदास यांनी दिली.

Leave a Comment