नवरात्रीमध्ये वापरल्या जाणा-या रंगांसंबंधी कोणत्याही धर्मग्रंथामध्ये सांगितलेले नाही. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत येणा-या वारावर हे रंग अवलंबून असतात. नवरात्रात याच रंगाची वस्त्रं नेसली म्हणजे जास्त पुण्य मिळते असंही नाही असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. त्यांनी नवरात्रातील ९ रंग दिले आहेत. बुधवार १० ऑक्टोबर पासून नवरात्र सुरू होत असून त्यादिवशी निळा रंग आहे. गुरूवार ११ ऑक्टोबर पिवळा, शुक्रवार १२ ऑक्टोबर हिरवा, शनिवार १३ ऑक्टोबर ग्रे, रविवार १४ ऑक्टोबर केशरी, सोमवार १५ ऑक्टोबर पांढरा, मंगळवार १६ ऑक्टोबर लाल, बुधवार १७ ऑक्टोबर जांभळा तर गुरूवार १८ ऑक्टोबरला गुलाबी रंग असल्याचं सोमण यांनी सांगितलं. नवरात्रातील प्रत्येक दिवशी एकाच रंगाची वस्त्रं वापरल्यानं महिलांच्या मनामध्ये समानतेची सुरक्षिततेची आणि एकतेची भावना निर्माण होते असं सोमण यांनी सांगितलं. नवरात्रात आदिशक्तीची, निर्मिती शक्तीची पूजा केली जाते. निर्मिती शक्ती आणि ९ या संख्येचे दृढ नाते आहे. बी जमिनीत रूजल्यानंतर ९ दिवसांनी अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून ९ महिने ९ दिवसांनी मूल जन्माला येतं म्हणून नवरात्र ९ दिवसांचं असतं. ९ या संख्येला ब्रह्म संख्या म्हणतात. सर्वात मोठा अंक ९ हाच आहे. अश्विन महिन्यात शेतातील धान्य तयार होऊन घरात येते म्हणून नवरात्रामध्ये आपण निर्मिती शक्तीची पूजा करत असतो. निर्मिती शक्ती हीच विश्वातील आदिशक्ती असल्याचं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.
