आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हाती घेतलेल्या दोन दिवसीय मतदार नोंदणी विशेष मोहिमेत १५ हजार नवीन मतदार झाले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचं आयोजन केलं होतं. २ आणि ३ मार्च अशा दोन दिवस झालेल्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेत १५ हजार नवीन मतदार नोंदणीचे अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्वत: काही मतदान केंद्रांवर भेटी देऊन या नोंदणीची पाहणी केली. या १५ हजारांमध्ये १८ आणि १९ वयोगटातील १३ हजार ९३६ अर्ज स्वीकारण्यात आले. सर्वाधिक म्हणजे २११२ अर्ज बेलापूरमध्ये तर सर्वात कमी म्हणजे ३८३ अर्ज मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात आले. गेल्या आठवड्यात राबवलेल्या याच प्रकारच्या मोहिमेत १० हजार नवमतदारांनी मतदार नोंदणीसाठी अर्ज केले होते. या मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान जिल्हाधिका-यांनी भेट देऊन पाहणी केली. मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सोयीसुविधा आहेत की नाही याची जिल्हाधिका-यांनी यावेळी खातरजमा केली.
