दस-याच्या निमित्तानं ठाणे पोलीसांनी आज आपल्या शस्त्रास्त्रांची पूजा केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही शस्त्रागारात विधीवत आणि पारंपरिक पध्दतीनं पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते हे शस्त्रपूजन करण्यात आलं. दसरा जिवांत क्षात्रभावाचं संवर्धन करतो. शस्त्रांची पूजा ही जिवांत प्रत्यक्ष क्षात्रतेज कार्यरत करण्याचं प्रतिकात्मक रूप आहे. दस-याच्या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा करून देवतांच्या मारक शक्तीला आवाहन करून स्वत:त तळपत असणा-या शस्त्राच्या धारेप्रमाणे क्षात्रतेजाची निर्मिती करून घ्यायची असते. क्षात्रतेजाच्या प्रक्षेपणामुळं जिवांत क्षात्रभाव निर्माण होऊन प्रत्यक्ष मायेतील कर्म करण्यास गती प्राप्त होऊन येणा-या प्रत्येक अडथळ्यांवर सूर्यनाडीच्या आधारे मात करणं शक्य होतं म्हणून दस-याच्या दिवशी क्षात्र लहरींना पूरक अशा प्रतिकाचं म्हणजे शस्त्रास्त्रांचं पूजन करणं हितावह असतं असा समज आहे. ठाणे पोलीसांनी पोलीस मैदानावर विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांची पूजा केली. पूजा झाल्यानंतर पोलीस आयुक्त फणसळकर यांनी उपस्थित पोलीस कर्मचा-यांना सोनं वाटून शुभेच्छा दिल्या.
