डोंबिवलीतील स. वा. जोशी विद्या संकुलात भव्य विभागीय विज्ञान संमेलन

जनरल एज्युकेशन सोसायटी, मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं ५ आणि ६ जानेवारी रोजी डोंबिवलीतील स. वा. जोशी विद्या संकुलात भव्य विभागीय विज्ञान संमेलन आयोजित केलं जाणार आहे. या विज्ञान संमेलनाचं उद्घाटन अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते होणार आहे. या विज्ञान संमेलनात योग, आयुर्वेद, निसर्गोपचार, पर्यावरण, जीवनशैली अशा विषयांवर नामवंत तज्ञांची व्याख्यानं होणार आहेत. या विज्ञान संमेलनास ८०० विज्ञानप्रेमी उपस्थित राहतील असा अंदाज आहे. या विज्ञान संमेलनात बाळ फोंडके – कृत्रिम बुध्दीमत्ता, विश्वासराव मंडलिक – दैनंदिन जीवनात योग, डॉ. जयंत देवपुजारी – आधुनिक काळात आयुर्वेद, डॉ. जगन्नाथ दिक्षित – आधुनिक जीवनशैली –आजार आणि आहार अशा विविध विषयांवरील चर्चासत्रात अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या विज्ञान संमेलनाच्या निमित्तानं एका विज्ञान प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं असून यात विविध विषयांवरील २५ हजार पुस्तकं असणार आहेत. जिल्ह्यातील विविध शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातून सादर करण्यात आलेल्या १०० कल्पक आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पाचं भव्य प्रदर्शन हे या विज्ञान संमेलनाचं वैशिष्ट्य ठरणार आहे. या प्रकल्पातून एका विद्यार्थ्याची निवड करून त्याला इस्त्रोला भेटण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या विज्ञान संमेलनात सुमारे १ हजार विद्यार्थ्यांकरिता चिल्ड्रन्स लॅबचा अभिनव प्रयोग आणि इतर १ हजार विद्यार्थ्यांसाठी एका खास वेगळ्या दालनामध्ये नेहरू विज्ञान केंद्राच्या मदतीने द्रवरूप नायट्रोजन आणि अन्य प्रयोग सादर केले जाणार आहेत.

 

Leave a Comment

%d bloggers like this: