गेल्या काही महिन्यांपासून तांत्रिक कामांसाठी बंद असलेले डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर येत्या एक महिन्यात नाट्यप्रेमींसाठी खुले करण्यात येईल अशी माहिती महापौरांनी दिली. महापौर मिनाक्षी शिंदे यांनी काल महापालिकेच्या अधिकारी-पदाधिका-यांसमवेत काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. घोडबंदर येथील नाट्यप्रेमींसाठी महापालिकेच्या वतीनं डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह उभारण्यात आले परंतु गेल्या काही महिन्यांपासून नाट्यगृहातील मिनी थिएटर तांत्रिक दुरूस्तीसाठी बंद होते. हे मिनी थिएटर लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी ठाण्यातील नाट्य संघटनांनी महापौरांकडे केली होती. या पार्श्वभूमीवर काल महापौरांनी मिनी थिएटरला भेट देऊन संबंधित कामांबाबत चर्चा केली. मिनी थिएटरचं काम ८० टक्के पूर्ण झालं असून उर्वरीत काम येत्या महिनाभरात पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे दैनंदिन निगा देखभालीसाठी आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करावेत तसंच संपूर्ण नाट्यगृहात चालू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. या सर्व कामांचा अहवाल सादर करून ही कामं मार्गी लावण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या. यावेळी मिनी थिएटरचं उर्वरित काम युध्द पातळीवर करून महापौरांनी दिलेल्या सूचनेनुसार महिन्याभरातच मिनी थिएटर कलाकारांसाठी आणि रसिकांसाठी खुले करण्यात येईल अशी ग्वाही अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी दिली.
