ठाण्यामध्ये ७५० सार्वजनिक तर ३१ हजार ७१६ घरगुती गणपतींचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन

गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हांला, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात ठाण्यामध्ये भावपूर्ण वातावरणात विघ्नहर्त्या श्री गणेशाला निरोप देण्यात आला. ढोल-ताशांचा कडकडाटात ध्वनी प्रदूषणाबाबतच्या सर्व नियमांची पायमल्ली करत काल ७५० सार्वजनिक तर ३१ हजार ७१६ घरगुती गणपतींना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ठाणे परिमंडळ १ मध्ये १०१ सार्वजनिक, ५ हजार ३०८ घरगुती गणपतींचं विसर्जन झालं. भिवंडी परिमंडळ २ मध्ये १२९ सार्वजनिक, २ हजार ५३० घरगुती गणपतींचं विसर्जन झालं. कल्याण परिमंडळ ३ मध्ये १६९ सार्वजनिक, ९ हजार ६११ घरगुती गणपतींचं विसर्जन झालं. उल्हासनगर परिमंडळ ४ मध्ये १९९ सार्वजनिक, १ हजार १०६ घरगुती गणपतींचं विसर्जन झालं. वागळे परिमंडळ ५ मध्ये १५२ सार्वजनिक, ४ हजार ४६१ घरगुती गणपतींचं विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आलं. ध्वनी प्रदूषणाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं सर्रास उल्लंघन यावेळी झालं. अनेक गणेशोत्सव मंडळांनी मोठमोठे डीजे लावून या ध्वनी प्रदूषणात भर घालण्याचंच काम केलं. पायी हळूहळू चाला मुखाने मोरया बोला, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, कपाळी केशरी गंध गणेशा तुझा मला छंद, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हांला अशा घोषणांनी वातावरण भक्तीमय झालं होतं. रात्री उशीरापर्यंत गणपती विसर्जनाच्या मिरवणुका सुरू होत्या. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये उडवण्यात आलेल्या गुलालामुळे रस्ते गुलाबी झाले होते.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading