ठाण्यामध्ये क्लस्टरचं वारं जोरात वाहत असताना अधिकृत धोकादायक इमारतीतील रहिवाशांना २ चटईक्षेत्राचा लाभ कधी मिळणार – रहिवाशांचा प्रश्न

ठाण्यामध्ये एकीकडे समूह विकास योजनेसाठी सर्वेक्षणास सुरूवात होत असताना २ चटईक्षेत्र निर्देशांकाच्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप होऊ शकलेली नाही. ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या विकासासाठी शासनानं २ चटई क्षेत्र मंजूर केलं आहे. पण अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. ठाण्यामध्ये अधिकृत धोकादायक इमारतीतून सुमारे अडीच हजार कुटुंबं राहत असून ही कुटुंबं या निर्णयाच्या अंमलबजावणीकडे डोळे लावून बसली आहेत. या इमारतीतून राहणारे रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत असून त्याकडे मात्र राजकीय पक्षांचं फारसं लक्ष दिसत नसल्याचं दिसत आहे. अनधिकृत इमारतीतून राहणा-या रहिवाशांचा पुळका येणारे हे राजकीय नेते अधिकृत इमारतीतून राहणा-या रहिवाशांकडे मात्र डोळेझाक करत आहेत. या इमारती बहुतांश नौपाडा आणि आजूबाजूच्या परिसरात असून हा परिसर साधारणत: भारतीय जनता पक्षाला मानणारा वर्ग आहे. राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही निर्णय होऊनही त्याची अधिसूचना भारतीय जनता पक्षाचं सरकार का काढू शकत नाही असा येथील रहिवाशांचा प्रश्न आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेनं समूह विकास योजनेसाठी जीवाचं रान केलं. मात्र धोकादायक इमारतींना २ चटई क्षेत्र निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शिवसेना तसंच इतर राजकीय पक्षांकडून फारशी हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळं सध्या तरी अशा अधिकृत आणि धोकादायक इमारतींमधून राहणा-या रहिवाशांना कुणीच वाली राहिलेला नाही. यामागे झारीतला शुक्राचार्य कोण असा प्रश्न अशा इमारतींमधून राहणा-या रहिवाशांना पडला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading