ठाण्यात मराठी व्यावसायिकाला स्थानिक गुंडांनी व्यवसाय बंद करण्यासह जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. ठाणे पूर्वतील फटाका मार्केट परिसरात दीपक झाडे या होतकरू मराठी तरूणानं स्वत:चे पोळी-भाजी विक्री केंद्र सुरू केलं आहे. या ठिकाणी याच परिसरात अवैध मटका-जुगाराचे अड्डे चालवणारा कुप्रसिध्द गुंड बाबू नाडर यांच्या नावाची दहशत दाखवून त्यांचा आशू नावाचा साथीदार पोळी-भाजी केंद्राबाहेर येऊन हुल्लडबाजी करू लागला. याचा जाब विचारल्यावर त्याने दादागिरी करून शिवीगाळ केली. यामुळे त्रस्त झालेल्या झाडे यांनी पोलीसांकडे तक्रार केली. पोलीसांनी या तक्रारीची दखल न घेता उलट झाडे यांनाच नोटीस बजावली. तसंच पोलीसांकडे तक्रार केली म्हणून या गुंडाने झाडे यांच्या दुकानासमोर येऊन त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा त्यांनी धनगर प्रतिष्ठानकडे धाव घेतली. त्यावेळी धनगर प्रतिष्ठानच्या पदाधिका-यांनी पोलीसांची भेट घेऊन त्यांना कारवाई संदर्भात निवेदन दिलं. पण पोलीसांनी याबाबत गंभीर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर प्रतिष्ठाननं दिला आहे.