ठाण्यात दुस-या सायकल मित्र संमेलनाचं आयोजन

ठाण्यात सायकल मित्र संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. ३ फेब्रुवारी रोजी हे सायकल मित्र संमेलन काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न होणार आहे. एका पत्रकार परिषदेत महापौर मिनाक्षी शिंदे यांनी ही माहिती दिली. डोंबिवली सायकल क्लब, नॅशनल युथ ऑर्गनायझेशन आणि क्रीडा भारतीच्या संयुक्त विद्यमानं २८ जानेवारी २०१८ मध्ये डोंबिवलीत पहिलं सायकल संमेलन झालं होतं. ठाण्यात ३ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत हे संमेलन होणार आहे. सायकल चालवणारा बिब्या हा तरूण या बोधचिन्हाचे आणि मानसी कुलकर्णी यांनी रचलेले, चिंटू भोसले यांनी संगीतबध्द केलेले आणि फुटयार्दोज स्कूल ऑफ म्युझिक मुंबई अँड ठाणे यांच्या विशेष सहकार्यानं तयार केलेल्या सायकल विषयक जनजागृती करणा-या संमेलन गीताचे यावेळी अनावरण करण्यात आले. या संमेलनात निबंध स्पर्धा, चित्रीकरण स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, पोस्टर, पेंटींग, चित्रकला, व्यंगचित्र, कोलाज आणि रांगोळी अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. ३ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता शिवाजी मैदान ते काशीनाथ नाट्यगृह अशी १० किलोमीटरची १ हजारहून अधिक सायकल स्वारांची सायकल फेरी आयोजित करण्यात आली आहे. सायकल हे वाहतुकीचं प्रमुख साधन बनून आर्थिक आणि आरोग्यामधील सामाजिक दरी दूर करण्याचं साधन म्हणून सायकल हा पर्याय पुढे यावा तसंच नागरिकांनी आपली वाहतूक, आरोग्य तसंच सामाजिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याकरिता प्रोत्साहन देणं हा या संमेलनाचा हेतू असल्याचं सांगण्यात आलं. या सायकल संमेलनात सायकल संग्रहालय निर्माण करमारे विक्रम पेंडसे आणि आशियातील सर्वात तरूण आयर्नमन रविजा सिंघल यांना गौरवण्यात येणार आहे. मुलुंड की सायकलवाली आणि मुंबईतील सायकल टू वर्कची आदर्श फिरोजा सुरेश यांचं सादरीकरण होणार आहे. सायकल पटूंच्या सायकल सफरी विषयकही मुलाखती घेतल्या जाणार आहेत. ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं या संमेलनाला उपस्थित रहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading