ठाण्यात एका महिलेवर चाकूनं हल्ला झाल्यानं खळबळ उडाली आहे.काल संध्याकाळी हा प्रकार घडला. सुरक्षा रक्षक मंडळाच्या एका ४२ वर्षीय महिलेवर विकास धनावडे या युवकानं हल्ला केला. विकास धनावडेला पोलीसांनी अटक केली आहे. ही महिला ठाणे महापालिकेच्या खोपट येथील मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण केंद्रावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. काल संध्याकाळी अचानक विकास धनावडे तिथे आला आणि धनावडेनं या महिलेच्या मानेवर मागच्या बाजूनं तीन-चार वार केले. अचानक हा प्रकार झाल्यामुळं परिचर्या संस्थेतील विद्यार्थिनीही घाबरून गेल्या. हल्ला केल्यानंतर धनावडे तिथेच उभे राहिला. नंतर पोलीसांनी त्याला ताब्यात घेतलं. या महिलेनं विकास धनावडेला सुरक्षा मंडळात नोकरी देण्याचं आमिष दाखवलं होतं. यासंदर्भात तो या महिलेला भेटण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ही महिला त्याला टाळत होती. त्यातूनच त्यानं तिच्यावर हल्ला केल्याचं पोलीसांनी सांगितलं.
