ठाण्यातील ब्राह्मण विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांनी टपाल दिनानिमित्त घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्र्यांचं दालन हे नेहमी राजकीय कार्यकर्त्यांनी गजबजलेलं असतं. काल मात्र मुख्यमंत्र्यांच्या दालनात लहान मुलांचा किलबिलाट सुरू होता. निमित्त होतं जागतिक टपाल दिनाचं. जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विभागानं शाळेतील विद्यार्थ्यांकडून पत्र लेखनाचा उपक्रम हाती घेतला होता. विद्यार्थ्यांनी लिहिलेली ही पत्रं मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याकडे सुपूर्द केली. त्यामुळं काल दुपारी मुख्यमंत्र्यांच्या दालनात लहान मुलांचा किलबिलाट सुरू होता. विशेष म्हणजे या शाळेतील मुलांनी पत्रलेखन उपक्रमात कुणीही न सांगता स्वत:च्या मनानं लिखाण केलं होतं. मुख्यमंत्री महोदय तुम्ही आमच्या शाळेला भेट द्याल का, आम्हांला नागपूरची संत्री मिळणार का, मला अमृता काकूंचं गाणं खूप आवडतं अशा आशयाचे विचार या लहान मुलांनी पोस्ट कार्डातून व्यक्त केले होते. हे विचार वाचून मुख्यमंत्र्यांनीही या मुलांना तितकीच दाद दिली. मुख्यमंत्र्यांच्या दालनात मुख्यमंत्री आणि मुलांमध्ये छान संवाद रंगला होता. मुख्यमंत्र्यांनी मुलांना त्यांच्या आवडी विचारल्या, नावं विचारली. मुलांनीही धीटपणे उत्तरं देत त्यांच्याशी हात मिळवला. प्रथमच मुख्यमंत्री दालनात मोठ्या शिशुगटातील मुलं पहायला मिळत होती. मुख्यमंत्र्यांनी बिस्किटं देऊन या मुलांचं तोंड गोड केलं. बिस्किटं मिळाल्यामुळं मुलंही आनंदित दिसत होती. या उपक्रमास मुख्याध्यापिका रोहिणी दिवाण, नेहा जोशी, प्राचार्य दास यांचं प्रोत्साहन लाभलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या वेळी संस्थेचे सचिव केदार जोशी, अध्यक्ष बोरवणकर आणि उपाध्यक्षा नमिता सोमण उपस्थित होत्या.

Leave a Comment

%d bloggers like this: