ठाण्यातील जलवाहतूक मार्गाचं येत्या मंगळवारी भूमीपूजन

कल्याण, ठाणे, मुंबई जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं भूमीपूजन येत्या मंगळवारी होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत हे भूमीपूजन होणार आहे. ठाणे महापालिकेनं तयार केलेल्या आराखड्यानुसार जेएनपीटीकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे. ठाण्यापलिकडील उपनगरांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली लोकसंख्यावाढ आणि त्याचा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर येणारा ताण यामुळे वाहतुकीसाठी सक्षम पर्याय मिळावा या हेतूनं जलवाहतूक मार्ग विकसित करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे यांनी लावून धरली होती. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आणि हा अहवाल केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सादर करण्यात आला होता. या जलमार्गाला देशातील १०१ राष्ट्रीय जलमार्गामध्ये स्थान मिळाले असून जेएनपीटीच्या माध्यमातून आता जलमार्ग विकसित करण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, वसई, नालासोपारा, नवी मुंबई या संपूर्ण परिसराला खाडी किनारा लाभला असून जलवाहतुकीमुळे लाखो नागरिकांना प्रवासाचा सक्षम आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: