ठाण्यातील कोळीवाड्यांचं सीमांकन महिनाभरात होणार सुरू

ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाचे काम महिनाभरात सुरू केलं जाईल अशी माहिती महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिली. आमदार निरंजन डावखरे यांच्या मागणीवरून महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान भवनात एका बैठकीचं आयोजन केलं होतं त्यावेळी मनुकुमार श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली. मुंबईतील कोळीवाड्यांच्या धर्तीवर ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील कोळीवाड्यांमधील परंपरागत रहिवाशांच्या नावावर जमीन करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. कोळी आणि बिगर कोळी व्यक्तींकडून शासकीय जागेवर वर्षानुवर्षे रहिवास केला असेल तर त्यालाही जमीन देण्याची सरकारची भूमिका महसुल मंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनात स्पष्ट केली होती. त्यानुसार या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आमदार डावखरे प्रयत्न करत आहेत. मुंबईच्या धर्तीवर ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील कोळीवाड्यांच्या जमिनी परंपरागत रहिवाशांच्या नावावर केल्या जातील असं महसूल सचिव श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं. येत्या महिनाभरात दोन्ही जिल्ह्यातील सीमांकनाला सुरूवात केली जाईल असं सांगितलं. मुंबईतील कोळीवाड्यांबाबत आराखडा तयार केला जात आहे. या कामात त्रुटी आढळल्यानंतर त्याची ठाणे आणि रायगडच्या आराखड्यात तातडीनं दुरूस्ती केली जाईल असंही श्रीवास्तव यांनी सांगितलं. कोळीवाड्यांच्या सर्वेक्षणाच्या वेळी मूळ रहिवाशांवर अन्याय होणार नाही याबाबत काळजी घेण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

 

Leave a Comment

%d bloggers like this: