आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांना आपल्या मुलांच्या कर्णबधीरपणावर उपचार करता येणं शक्य नव्हतं अशा १०० मुलांच्या कर्णबधीरतेवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यामुळं त्यांच्या जीवनातील स्तब्धतेचा अंधार दूर झाला आहे. अशा १०० मूकबधीर मुलांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, ज्युपिटर रूग्णालय आणि ज्यांनी ही शस्त्रक्रिया केली त्या डॉ. उप्पल दाम्पत्याविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. महापालिका आयुक्तांनी या आगळ्यावेगळ्या सामाजिक उपक्रमाचा भाग बनण्याचं भाग्य लाभल्याची कृतज्ञता व्यक्त करून कर्णबधीरमुक्त ठाणे मोहिमेचा शुभारंभ केला. ज्या १०० मुलांच्या बहिरेपणावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्या मुलांचे स्नेहमिलन ज्युपिटर रूग्णालयात आयोजित करण्यात आले होते. कर्णबधीरपणाविषयी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार असून नवजात शिशुंची हिअरिंग टेस्ट करण्यासाठी मशिन विकत घेऊन ते शहरातील प्रसुतीगृहांमध्ये उपलब्ध करून दिलं जाणार आहे. ज्युपिटर रूग्णालयात अशा मुलांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असून गरजू आणि गरीब कुटुंबासाठी फक्त १०० रूपयात निदान करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. तसंच याबाबतची शस्त्रक्रिया २ लाखांऐवजी ८० हजारांमध्ये करण्यात येणार असल्याचं ज्युपिटर रूग्णालयाचे संचालक डॉ. अंकित ठक्कर यांनी सांगितलं. ऐकण्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलांचे भाषा कौशल्य आणि बोलणं विकसित व्हायला ३ वर्षांचा काळ जातो. ऐकू येणारे आवाज ओळखण्यासाठी तसंच बोलता येण्यासाठी लहान मुलांना नियमित थेरपीची आवश्यकता असते याची जबाबदारी महापालिका उचलणार असून प्रत्येक मुलासाठी २० हजार रूपयांचं अर्थसहाय्य महापालिका करणार आहे. डॉ. प्रदीप उप्पल यांनी जी मुलं आयुष्यात कधीच बोलू शकली नसती ती मुलं बोलताना पाहून आपल्याला आनंद होत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
