ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांना कच-याचे विलगीकरण आणि त्यावरील प्रक्रियेबाबत प्रशिक्षण

ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांना साफसफाई करतानाच कच-याचे विलगीकरण आणि त्यावरील प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या अभियानाची माहिती उपायुक्त मनिष जोशी यांनी दिली. दैनंदिन साफसफाई करताना कच-याचे विलगीकरण कसे करावे, त्यावर प्रक्रिया कशी करावी तसंच साफसफाई आणि कचरा विलगीकरण करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी तज्ञ मार्गदर्शक जयंत जोशी यांनी मार्गदर्शन केलं. या कार्यशाळेस कळवा, वर्तकनगर, माजिवडा- मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील घनकचरा विभागाचे ५०० सफाई कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचं मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत महापालिकाही सहभागी झाली आहे. ठाण्याला स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे म्हणून अव्वल स्थान मिळावं याकरिता ठाणेकरांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

 

 

Leave a Comment

%d bloggers like this: