ठाणे महापालिकेच्या प्रस्तावित कोस्टल रोडला चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीनं विरोध दर्शवला आहे. महापालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत शहराच्या किनारपट्टी लगत कोस्टल रोड निर्मितीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ठाणे शहराच्या किनारपट्टीलगत कोस्टल रोड तयार करून तो मुंबईच्या कोस्टल रोडला जोडण्याची महापालिकेची योजना आहे. मात्र या कोस्टल रोड मध्ये शहरातील किनारपट्टीवर असलेले कोळीवाडे आणि गावठाणं बाधित होण्याची शक्यता असल्यानं या कोस्टल रोडला चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीनं विरोध दर्शवला आहे. शहराच्या विकासाचे विविध प्रस्ताव प्रस्तावित करताना कोळीवाड्यांच्या अस्तित्वाचा विचार केला जात नाही. कोळीवाड्याचे प्रतिनिधीत्व करणारे नगरसेवक केवळ बघ्याची भूमिका घेतात. हे समूह विकास योजनेच्या वेळी दिसून आलं. कालही कोस्टल रोडला सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळत असताना कोळीवाड्यातील नगरसेवक मूग गिळून गप्प बसले होते. हे खेदजनक असून शहराच्या विकासाकरिता इंचभरही जमीन कोळीवाडे आता देणार नाही अशी भूमिका समितीनं घेतली आहे. चेंदणी कोळीवाड्याची जमीन रेल्वेसाठी घेण्यात आली. विकास आराखड्यात चेंदणी कोळीवाड्यातून तीन रस्ते प्रस्तावित आहेत. समूह विकास योजनेत चेंदणी कोळीवाडा झोपडपट्टी म्हणून विकसित करण्याची योजना आहे आणि आता कोस्टल रोडची भर पडली आहे. कोस्टल रोडचा प्रस्ताव आणि आराखड्याची माहिती जनतेला उपलब्ध व्हावी आणि हा प्रस्ताव जनहिताचा आहे की नाही याचा निर्णय जनतेला घेऊ द्यावा अशी समितीची मागणी आहे.
