ठाणे महापालिकेचा सन २०१९-२० चा कोणतीही करवाढ आणि विशेष मोठी योजना नसणारा ३ हजार ८६२ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज स्थायी समितीला सादर केला. ठाणे महापालिका आयुक्तांनी सादर केलेला हा पाचवा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे संकल्पपूर्ती अर्थसंकल्प असल्याचं पालिका आयुक्तांनी यावेळी बोलताना सांगितलं. गेल्या ४ वर्षाच्या कार्यकाळात महापालिकेचं उत्पन्न दुपटीनं वाढलं आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात पूर्वीचे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात आला असून यंदा प्रथमच अर्थसंकल्पाबरोबर फलनिष्पती अहवाल देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात मालमत्ता करापोटी ६५० कोटी रूपयांचं उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलं आहे तर विकास आणि तत्सम शुल्कापोटी ९२४ कोटी रूपयांचं उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलं आहे. सेवाकर अनुदान, १ टक्का मुद्रांक शुल्क अधिभार अनुदान, थकीत स्थानिक संस्था करापासून ९८७ कोटी रूपयांचं उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलं आहे. स्मार्ट मिटरिंग पध्दतीनं पाणी पुरवठा करण्यास मान्यता मिळाल्यानं या अर्थसंकल्पात पाणी पुरवठा आकारापोटी १७५ कोटी रूपयांचं उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलं आहे. स्थावर मालमत्ता विभाग, जाहिरात प्रत्येकी २० कोटी, रस्ते खोदाई शुल्कापोटी ७५ कोटी तर अग्निशमन शुल्कापोटी दीडशे कोटी रूपयांचं उत्पन्न या अर्थसंकल्पात अपेक्षित धरण्यात आलं आहे. शहरामध्ये नव्यानं सुरू होणा-या उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणं आणि त्याद्वारे शहराच्या आर्थिक विकासाला चालना देण्याकरिता ग्लोबल इम्पॅक्ट हब हा उपक्रम सुरू करण्याचं प्रस्तावित करण्यात आलं आहे. यासाठी तळ अधिक दहा मजल्याची इमारत विकासकाकडून दिली जाणार असून यामुळं महापालिकेची ७० कोटी रूपयांची बचत होणार आहे. ज्युपिटर हॉस्पिटल जवळ १६०० चार चाकी वाहनांसाठी टीडीआरच्या माध्यमातून काम केलं जात असून यामुळं ११९ कोटी रूपयांची बचत होणार आहे. कशिश पार्क येथील वाहनतळामुळे पालिकेची ३२ कोटी रूपयांची बचत होणार आहे. हा अर्थसंकल्प सादर करताना पालिका आयुक्तांनी शेरोशायरी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
