गेली अनेक वर्षे उर्जा संवर्धन, उर्जा कार्यक्षमता आणि अपारंपारिक उर्जेचा वापर या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारी ठाणे महानगरपालिका राज्यात पुन्हा एकदा अव्वल ठरली असून उर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन या दोन राज्यस्तरिय सर्वोच्च पुरस्काराने महापालिकेचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर आणि विद्युत विभागाचे उपनगर अभियंता सुनील पोटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. गेली १३ वर्षे ठाणे महानगरपालिका उर्जा संवर्धन, उर्जा कार्यक्षमता या क्षेत्रात सातत्याने पुरस्कार मिळविणारी एकमेव महापालिका आहे. मागील अनेक वर्षांपासून उर्जा संवर्धन, उर्जा व्यवस्थापन, उर्जा कार्यक्षमता आणि अपारंपारिक उर्जेचा वापर या क्षेत्रात ठाणे महापालिका उल्लेखनिय कामगिरी करीत आहे. ठाणे महापालिकेच्या राज्यस्तरिय आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध प्रकल्पांची दखल घेवून राज्य शासनाच्या महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणच्या १३ व्या उर्जा संवर्धन आणि व्यवस्थापनाच्या दोन राज्यस्तरिय सर्वोच्च पुरस्काराने महापालिकेचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय येथे हाती घेतलेल्या उर्जा संवर्धनाच्या विविध प्रकल्पांची दखल घेवून सर्टिफिकेट ऑफ मेरिट या विशेष पुरस्काराने ठाणे महानगरपालिकेचा सन्मान करण्यात आला. पालिकेने पथदिव्यांसाठी एलईडी लाईटचा केलेला प्रभावी वापर, महापालिकेच्या इमारतींमध्ये उर्जा संवर्धन उपकरणांचा वापर, महापालिकेच्या विविध इमारती, शाळांवर सौर उर्जा प्रकल्प, सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रीक बसला चालना तसेच युएनईपी प्रकल्पातंर्गत डिस्ट्रीक्ट कुलिंग प्रकल्पासाठी ठाणे महापालिकेची केलेली निवड या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाच्या महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाच्या वतीनं ठाणे महापालिकेचा सन्मान करण्यात आला आहे.
