ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पुणे ग्रामीण भागात चोरी करणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून १०५ मोटार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात ठाणे पोलीसांना यश मिळालं आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. वृंदावन सोसायटीतील उध्दव साठे यांच्या मालकीची महिंद्र बोलेरो ही गाडी चोरीला गेली होती. या चोरीचा तपास करताना सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक विश्लेषणाअंती तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक महेश जाधव यांनी हे वाहन पुणे येथून ताब्यात घेतलं. त्यानंतर यामुळं आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वरिष्ठांना सांगितली. यावर वेगवेगळी ५ तपास पथकं तयार करण्यात आली. या ५ पथकांनी तपास करून वाहन चोरणारे, चोरीची वाहनं खरेदी करणारे, चोरीच्या वाहनांमध्ये इंजिन आणि चेसीस मध्ये फेरफार करून नागालँड येथून वाहनाची कागदपत्रं बनवणारे, बेळगाव, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये चोरीची वाहनं विक्री करणारे एजंट अशा गुन्हेगारांना नियोजनबध्द सापळा रचून वाहन चोरी करणारी टोळकी आणि त्यांच्या म्होरक्यास अटक केली. संदीप लागू, सादीक मुल्ला, अंता गोकाक, विनीत मादीवाल, मांगीलाल नागौर, रामप्रसाद इनानिया, जावेद खान, अल्ताफ कुरेशी, महम्मद खान या ८ जणांना अटक केली. यांच्या चौकशीत १७० वाहन चोरीची माहिती मिळाली. त्यापैकी १०५ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून त्यातील ८० वाहनं जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये महिंद्रा पीकअप ६९, महिंद्र बोलेरो ८, होंडा सिटी, वेर्णा आणि ब्रिझा प्रत्येकी १ अशी ३ कोटी ४० लाखांची वाहनं राजस्थान, कर्नाटक, पुणे आणि मुंबई परिसरातून जप्त केली असल्याचं सांगण्यात आलं. विविध ठिकाणी वाहनं चोरी करून चोरलेली वाहनं पुण्यातील एका गोदामात ठेवून अशा वाहनांचे इंजिन आणि चेसीस नंबरमध्ये बदल करून अथवा न करता नागालँड येथे वाहनाची कागदपत्रं तयार करून ही वाहनं कर्नाटक, राजस्थानमध्ये एजंटांमार्फत विक्री करण्याची या टोळीची पध्दत होती. वाहन चोरी टाळण्यासाठी सार्वजनिक रस्त्यावर अथवा निर्जन स्थळी वाहनं उभी करू नयेत, जीपीएस सारखी यंत्रणा वाहनात बसवावी, क्लोज सर्किट कॅमे-याच्या छायेत वाहनं उभी करावीत, वाहनाच्या दरवाजाच्या काचांवर वाहन क्रमांक आणि मालकाचे संपर्क क्रमांक असावेत, गाडीला स्टेअरिंग लॉक आणि अलार्म सिस्टिम बसवण्याची व्यवस्था असावी अशा सूचना पोलीसांनी केल्या आहेत.
