ठाणे जिल्हा परिषदेचं स्वत:चं संकेतस्थळ सुरू

ठाणे जिल्हा परिषदेचं कामकाज अधिक गतीमान आणि कार्यक्षम करणे तसंच ग्रामीण जनतेस दिल्या जाणा-या सेवा अधिक प्रभावी आणि किफायतशीर रित्या उपलब्ध करून देणे ही काळाची गरज ओळखून ठाणे जिल्हा परिषदेनं स्वत:चं संकेतस्थळ सुरू केलं आहे. झेडपी ठाणे डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या नावानं हे संकेतस्थळ विकसित करण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव यांच्या हस्ते या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण भागातील जनतेच्या आणि गरजू लाभार्थींकरिता राबवण्यात येणा-या योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्याकरिता आवश्यक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा उपयोग लाभार्थींना योजनेचा उद्देश, पात्रता, मंजूर निधी, लाभ मिळवण्याकरिता अर्ज नमुने, अर्जाची सद्यस्थिती याबाबतची माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून विना खर्चात मिळू शकणार आहे. जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, विषय समित्यांची रचना, जिल्हा परिषदेचे गट आणि गणनिहाय पत्ते, संपर्क क्रमांक छायाचित्रासह उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील अडचणी, समस्या आता ऑनलाईन पध्दतीनं जिल्हा परिषदेच्या दरबारी या संकेतस्थळावरून मांडता येणार आहेत. या संकेतस्थळावरची सर्व माहिती वेळोवेळी अद्ययावत केली जाणार आहे. हे संकेतस्थळ पेस इन्फोटेकनं विकसित केलं असून यासाठी विस्तार अधिकारी वैभव वायकर, जिल्हा माहिती तंत्रज्ञान अधिकारी अर्पिता वैद्य आणि इतरांनी मेहनत घेतली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading