ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीला लावतो सांगून एका भामट्यानं २५ बेरोजगारांची सुमारे २४ लाखांची फसवणूक केली आहे. वागळे इस्टेट येथील शांतीनगरमध्ये राहणा-या हर्षाली राणे यांची त्यांच्याच शेजारी राहणा-या नरेश सुर्वे याच्याशी ओळख झाली. यावेळी नरेश यानं आपल्या मंत्रालयात नोकरीला असून सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असल्याचं सांगितलं. आपली बड्या अधिका-यांशी ओळख असून महसुल विभागात नोकरी लावण्याचं आमिष त्यांना दाखवलं. त्यासाठी आधी ७० हजार आणि नोकरीला लागल्यावर ५० हजार द्यावे लागतील असं सांगितलं. हर्षाली यांना नोकरीची गरज असल्यानं त्यांनी स्वत:ला आणि त्यांच्या भावाला नोकरी लावण्यासाठी १ लाख ४० हजार रूपये नरेशला दिले. काही दिवसानंतर नरेशनं लवकरच रूजू होण्याचं पत्र मिळेल असं सांगून आणखी कोणाला नोकरीची गरज असेल तर सांगा आपण त्याचे काम करून देऊ असं सांगितलं. त्यावर विश्वास ठेवून हर्षाली यांनी आपल्या आणखी काही नातेवाईकांचा नरेशची संपर्क करून दिला. अशाप्रकारे नरेशने तब्बल २५ जणांकडून २३ लाख ७० हजार रूपये उकळले. बरेच दिवस नोकरीबाबत वारंवार विचारणा करूनही नरेश टाळाटाळ करू लागल्यानं हर्षाली आणि इतरांना संशय आला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन याबाबत चौकशी केली असता त्यांना नरेश सुर्वे नावाचा कोणीही जिल्हाधिकारी कार्यालयात नसल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर हर्षाली आणि इतरांनी पोलीसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
