जिल्ह्यातील ८५१ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना वेतन आणि भत्त्यांच्या थकबाकीपोटी १२ कोटी रूपये मिळणार आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नानं हा निधी मंजूर झाला असून या शिक्षकांच्या बँकेतील खात्यात आठवडाभरात रक्कम जमा होणार आहे. जिल्ह्यातील १९४ खाजगी, प्राथमिक शाळेमधील शिक्षकांचा जानेवारी आणि फेब्रुवारी २०१७ मधील २ महिन्याचा पगार मिळाला नव्हता. तर या शिक्षकांचीच २००७ ते २०१७ अशी १० वर्षातील अनुदान टप्पा आणि वरिष्ठ वेतन श्रेणीच्या फरकाची रक्कम थकीत होती. यासंदर्भात अनेक शिक्षकांनी डावखरेंना या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली होती. आमदार निरंजन डावखरे यांनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांच्या २ महिन्याच्या पगाराचे ७ कोटी ३१ लाख रूपये आणि १० वर्षाच्या थकबाकीपोटीचे ५ कोटी ५५ लाख रूपये मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले होते. मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्र्यांनी १२ कोटी ८६ लाखांचा निधी मंजूर केला होता. मात्र शिक्षण विभागाकडे निधी वर्ग झाल्यानंतर शिक्षण संचालकांची मान्यता नसल्यामुळं रक्कमेचं वाटप झालं नव्हतं. डावखरे यांनी शिक्षण संचालक सुनिल चव्हाण यांना पत्र पाठवल्यानंतर कोकण विभागाच्या उपसंचालकांना निधी वितरित करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्ह्याच्या पे युनिटनं याप्रकरणी कार्यवाहीला सुरूवात केली आहे. त्यामुळं येत्या आठवडाभरात शिक्षकांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना यामुळं दिलासा मिळाला आहे.
