जिल्ह्यातील १०७ अपघात स्थळांची एक समिती प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार

जिल्ह्यामध्ये शहर आणि ग्रामीण भागात मिळून राष्ट्रीय महामार्ग तसंच इतर मार्गांवर १०७ अपघात स्थळं असून या प्रत्येकाची संबंधित विभागाच्या अधिका-यांची एक समिती प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहे. त्याचप्रमाणे या अपघातस्थळी कोणती उपाययोजना तातडीनं करावी लागेल यावर कार्यवाही करेल. जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत दीर्घकालीन आणि तात्पुरत्या उपाययोजना तातडीनं सर्व संबंधित विभागांनी कळवाव्यात असं सांगण्यात आलं. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी या बैठकीत माहिती दिली की शहर परिसरात राष्ट्रीय महामार्गावर १८ आणि राज्य महामार्गावर १२ तर इतर मार्गांवर २९ अशी ५९ अपघातस्थळं आहेत. ग्रामीण भागात राष्ट्रीय महामार्गावर २७, राज्य महामार्गावर ११ अशी ३८ तर नवी मुंबई भागात राष्ट्रीय महामार्गावर १०, द्रूतगती महामार्गावर १ अशी एकूण १०७ अपघातस्थळं आहेत. रस्ते अपघातात दरवर्षी १० टक्के घट करण्यासाठी गांभीर्यानं उपाययोजना करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी दुभाजक तोडण्यात आले आहेत. पेट्रोल पंप्स, धाबे, हॉटेल्स अशा ठिकाणी दुभाजक तोडून वाट केल्यानं या ठिकाणी अपघाताचे जास्त प्रमाण दिसत आहे. याशिवाय महामार्गाच्या लगतच्या ग्रामपंचायतींकडून कचरा आणि राडारोडा टाकला जातो. अनेकदा त्याला आगी लावल्यामुळे दृश्यमानता कमी होऊन अपघात होतात असे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सर्व शासकीय अधिकारी-कर्मचा-यांनी हेल्मेट घालून आलं पाहिजे असं परिपत्रक काढण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे, ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापक दिलीप पटेल, जिल्हा शल्य चिकित्सक केदार पवार उपस्थित होते.

Leave a Comment

%d bloggers like this: