जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संकुलातून मतदार नोंदणीसाठी अल्प प्रतिसाद मिळाला आहे. सहकारी गृहनिर्माण सोसायटीमधून मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी होण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही बाब उघड झाली. जिल्ह्यामध्ये १७ हजार ५१२ गृहनिर्माण संस्था आहेत. त्यापैकी ३ हजार ५३ गृहनिर्माण संस्थांमधून मतदानाशी संबंधित केवळ २२ अर्ज आले आहेत. नवीन नाव नोंदणी, दुबार नाव वगळणे, दुरूस्ती अशा प्रकारचे हे अर्ज आहेत. खरंतर मोठ्या प्रमाणावर अर्ज येणं अपेक्षित असल्याचं जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केलं. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सचिव आणि अध्यक्षांना मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून घोषित करण्यात आलं आहे. याचा आधार घेत ३१ ऑक्टोबर पर्यंत गृहनिर्माण संस्थेतील मतदारांमध्ये मतदारयादी संक्षिप्त पुनरिक्षण मोहिम राबवली जाणार आहे. यामध्ये मृत, दुबार, स्थलांतर आणि नवीन मतदार नोंदणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मतदार यादीतील छायाचित्र, चुकीची नावं, पत्ता दुरूस्ती, यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिका-यांनी निवडणुक यंत्रणेला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केलं. गृहनिर्माण संस्थांनी भरलेले अर्ज निवडणूक विभागात द्यावेत असं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिका-यांनी केलं. गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिका-यांना आता अधिकार मिळाले असून त्यांना ओळखपत्रही देण्यात आली आहेत त्यामुळं त्यांना आपल्या गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांची अधिकृत संपर्क साधून माहिती देता येणार आहे. यावेळी काही गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिका-यांना जिल्हाधिका-यांच्या हस्ते ओळखपत्रांचं वाटप करण्यात आलं.
