जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्पांना तातडीनं पूर्ण करण्यासाठी लवकरच सर्व संबंधितांची बैठक – राज्यपाल

जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्पांना तातडीनं पूर्ण करण्यासाठी लवकरच सर्व संबंधितांची बैठक राजभवनात आयोजित केली जाईल असं राज्यपाल विद्यासागर राव यांनी सांगितलं. आदिवासी सेवा मंडळाच्या शहापूर तालुक्यातील गोठेघर आश्रमशाळा येथे साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या अर्थसहाय्यातून बांधण्यात आलेल्या २ वसतीगृह इमारतींच्या तसंच भोजन कक्षाला भेट देऊन राज्यपालांनी त्याची पाहणी केली त्यावेळी राज्यपाल बोलत होते. आदिवासी विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षणासमवेत विविध कौशल्य देखील आत्मसात करून घेणं आवश्यक असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. आदिवासी मुलांना शिक्षण मध्येच न सोडण्याचं आवाहनही राज्यपालांनी केलं. विशेष म्हणजे राज्यपालांनी आपलं भाषण मराठीतून करत सर्वांना सुखद धक्का दिला. आश्रमशाळा आणि वसतीगृहाचं कौतुक करून इतकी सुंदर, सुसज्ज आणि हिरवीगार आश्रमशाळा आपण पहिल्यांदाच पाहिल्याचंही त्यांनी सांगितलं. आदिवासी विद्यार्थ्यांना धनुर्विद्येचं प्रशिक्षण देण्याची सूचना यावेळी राज्यपालांनी केली. त्यासाठी आवश्यक ते साहित्य स्वत: उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. विद्यार्थ्यांनी योग नियमित करावेत असं सांगताना विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहनही राज्यपालांनी केलं.

 

Leave a Comment

%d bloggers like this: