ठाणे जिल्हा सामान्य रूग्णालयाचं स्थलांतर करण्याबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयाची इमारत मोडकळीस आल्यानं तिचे स्थलांतर करावं लागणार आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली होती. त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयाची इमारत राज्य कामगार विमा योजनेच्या रूग्णालय इमारतीत हलवावी किंवा कसे याबाबत ही समिती शासनाला अहवाल देणार आहे. या समितीमध्ये आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, महापालिका आयुक्त, आरोग्य सेवा संचालनालयाचे आयुक्त, आरोग्य सेवा संचालक आणि जिल्हाधिकारी हे सदस्य असतील. ही समिती जिल्हा रूग्णालयाच्या सध्याच्या इमारतीची पाहणी करून उपाययोजना सुचवेल. एक महिन्यात ही समिती अहवाल देईल अशी अपेक्षा आहे.
