घोडबंदरवरील वाहतूक कोंडीचा नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेण्याचे आयुक्तांचे आदेश

मेट्रो आणि महापालिकेच्या पाणी पुरवठा तसंच मलनिस्सारण वाहिन्यांचे काम सुरू असल्यानं घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून महापालिका आयुक्तांनी सर्व शासकीय यंत्रणांच्या अधिका-यांची बैठक घेऊन नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. सध्या घोडबंदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून या परिसरातील रहिवाशांचे हाल होत आहेत. मेट्रोसाठी तीन हात नाक्यापासून घोडबंदर रस्त्यावर अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. त्यांची लांबी-रूंदी ज्या ठिकाणी कमी करणं शक्य असेल त्या ठिकाणी कमी करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या अधिका-यांना दिल्या. मेट्रोसाठी टाकण्यात आलेली अडथळ्यांची लांबी ९ मीटरपर्यंत कमी करावी, ज्या ठिकाणी हे अडथळे पदपथावर सरकवता येत असतील तर ते पदपथावर सरकवण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या. ज्या ठिकाणी मेट्रोचं काम अद्याप सुरूच झालं नाही तेथील अडथळे काढून काम ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी असे अडथळे लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महापालिकेच्या वतीनं पाणी पुरवठा विभागाच्या जल तसंच मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचं काम सुरू आहे ते युध्द पातळीवर पूर्ण करण्याचे आणि एकाच वेळी दोन्ही बाजूंच्या सेवारस्त्यावर खोदकाम न करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. सेवा रस्त्यांवरील बेवारस वाहनं तात्काळ उचलण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी केल्या असून दोन्ही सेवा रस्त्यांवरील कापुरबावडी ते गायमुख पर्यंतच्या सर्व गॅरेजेसवर कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: