मुंब्रा-पनवेल रस्त्यावरील गोदामं फोडून चोरी करणा-या १२ जणांच्या टोळीला शीळ-डायघर पोलीसांनी अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भागातील चो-यांचं प्रमाण वाढल्यामुळं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. काही चोर रात्रीच्या वेळी गोदामं फोडून माल चोरून नेत होते. २७ नोव्हेंबरला १० झेरॉक्स मशिन तर १८ डिसेंबरला १ हजार २१२ लोखंडी पत्रे चोरीला गेले होते. याप्रकरणी पोलीसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीसांनी विशेष पथकं निर्माण करून तपासाला सुरूवात केली. अथक प्रयत्नानंतर पोलीस उपनिरिक्षक विकास राठोड आणि हवालदार शिरसाट यांना झेरॉक्स मशिन चोरी करणारे आरोपी एका टेम्पोमध्ये झेरॉक्स मशिन घेऊन गुजरातकडे निघाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांचं पथक गुजरातला तपासासाठी गेलं. त्यांनी गुजरात पोलीसांच्या मदतीनं अमित दरडा, महेशभाई ठक्कर, खूश गडा, झुल्फीकार शेख, चंद्रकांत छेडा यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या १५ लाखांच्या झेरॉक्स मशिन हस्तगत करण्यात आल्या. पत्र्यांच्या प्रकरणात हवालदार शिरसाठ यांना हे आरोपी भांडार्ली येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून आशिष शेख, असिफ शेख, मितेश राजभर, महम्मद सिकंदर, प्रकाश चौधरी, विनोदकुमार जयस्वाल, सूरज केवट, शबानअली अख्तरअली खान यांना ताब्यात घेतलं त्यांच्या चौकशीत त्यांनी अशाप्रकारचे ४ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून लोखंडी पत्रे, पाईप, डाळी असा १५ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. या दोन्ही टोळीतील आरोपींकडून ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. एका पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी ही माहिती दिली.
