गॅसबाबत चुकीचं हमीपत्र आढळल्यास शिधापत्रिका धारकावर कारवाई करण्याचा इशारा

गॅसबाबत चुकीची हमीपत्रं आढळल्यास शिधापत्रिका धारकांवर कारवाईचा इशारा शिधावाटप अधिका-यांनी दिला आहे. एका पत्रकार परिषदेत हा इशारा देण्यात आला. जिल्ह्यामध्ये ५९० रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून ८८ टक्के अन्नधान्याचे वाटप ई-पॉस मशिनच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळं यंत्रणेत पारदर्शीपणा येण्याबरोबरच अनावश्यक लाभार्थींची संख्या कमी झाल्यानं धान्याची बचत झाली आहे. जिल्ह्यात केरोसीन पात्र शिधापत्रिका धारक १ लाख ३८ हजार असून पॉस द्वारे विक्री सुरू झाल्यानंतर ७२ किलोलिटर्स केरोसिनची गरज कमी झाली आहे. रास्त भाव दुकानांमार्फत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यास धान्य वाटप केलं जातं. अंत्योदय योजनेचे ४६ हजार १७४ शिधापत्रिका धारक आहेत. तर प्राधान्य कुटुंब योजनेचे ९३ हजार ६२५ शिधापत्रिका धारक आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी ठाणे यांच्या कार्यक्षेत्रात मुरबाड १९६, शहापूर १६५, भिवंडी १५७, कल्याण ४२, अंबरनाथ ३१ अशी एकूण ५९१ रास्त भाव धान्य दुकानं आहेत. या महिन्यात १०० टक्के शिधापत्रिका धारकांचे संगणकीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading