कृत्रिम तलावातील शुध्द पाण्यातच गणेश विसर्जन करणं योग्य – दा. कृ. सोमण

कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करण्यास विरोध होत असला तरी प्रदूषित पाण्यापेक्षा कृत्रिम तलावातील शुध्द पाण्यातच गणेश विसर्जन करणं योग्य होईल असं मत पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केलं आहे. सध्या गणपती विसर्जन वाहत्या पाण्यात करायचं की कृत्रिम तलावात करायचं यावरून वाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर दा. कृ. सोमण यांनी हे मत व्यक्त केलं आहे. शास्त्रामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान्हकाली नदीकाठी अथवा शेतात जाऊन तिथेच मातीची गणेशमूर्ती तयार करायची आणि पुजून विसर्जन करायची हे ज्या काळात सांगितले गेले त्या काळात लोकसंख्या आणि गणेश मूर्तींची संख्या कमी होती तसंच त्या काळी मातीच्याच मूर्ती केल्या जात होत्या. आता शुध्द पाण्याच्या नद्याही नाहीत आणि मूर्तीही मातीच्या नाहीत त्यामुळं प्रदूषित पाण्यापेक्षा कृत्रिम तलावातील शुध्द पाण्यातच गणेश मूर्तींचं विसर्जन करणं योग्य होईल असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. गणेश विसर्जन मिरवणुकीत डी जे अथवा मोठ्या आवाजाचे ध्वनीवर्धक वापरू नयेत. जलप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी असं सोमण यांनी सांगितलं. उद्या अनंत चतुर्दशी आहे त्यामुळं उद्या गणेश विसर्जन होणार आहे. खरंतर अनंत चतुर्दशी आणि गणेश मूर्ती विसर्जन यांचा काहीही संबंध नाही. मग अनंत चतुर्दशीलाच गणेश मूर्तींचं विसर्जन का केलं जातं कारण अनंत चतुर्दशीच्या दुस-या दिवशी भाद्रपद पौर्णिमा असते. कधीकधी पौर्णिमेच्या दिवशीच महालयारंभ असतो. म्हणून अनंत चतुर्दशीचा दिवस हा गणेश मूर्ती विसर्जनाचा शेवटचा दिवस असतो असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

%d bloggers like this: