कापुरबावडीमध्ये नवीन विश्रामगृह बांधलं जाणार आहे. गेल्या काही वर्षामध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रमुख व्यक्ती आणि सरकारी दौ-यावर येणा-या अधिका-यांचा वावर वाढला आहे. मात्र सध्याचे विश्रामगृह अपुरे पडत आहे. या पार्श्वभूमीवर दोन वर्षापूर्वी कापुरबावडी येथील सरकारी भूखंडावर नवे विश्रामगृह उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता पण त्यावर निर्णय झाला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर आमदार निरंजन डावखरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांची भेट घेतली होती. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही विनंती केल्यानंतर त्यांनी विश्रामगृहासाठी निधी देण्याचं आश्वासन दिलं आहे. सध्याच्या शासकीय विश्रामगृहात जागा कमी उपलब्ध असल्यामुळे लोकप्रतिनिधी आणि दौ-यावर आलेल्या अधिका-यांची अडचण होते. त्यामुळं कापुरबावडी येथे प्रशस्त विश्रागृह साकारल्यास सर्वांची सोय होऊ शकेल असं आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलं. चंद्रकांत पाटील यांनी विश्रामगृहासाठी ४२ कोटींच्या निधीची तरतूद करण्याचं आश्वासन दिलं आहे.
