कल्याण पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात स्फोटकं सापडल्यानं खळबळ उडाली आहे. कल्याणच्या पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर एका रिक्षात स्फोटकं ठेवण्यात आल्याच्या निनावी चिठ्ठीमुळं पोलीसांची काल खळबळ उडाली. पोलीसांनी या चिठ्ठीची गंभीर दखल घेत या रिक्षाचा शोध सुरू केला. बॉम्ब शोध नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. पोलीसांच्या शोध मोहिमेत पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारातील एका रिक्षात ४ डिटोनेटर आणि २ जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. पोलीस उपायुक्त कार्यालयासह ३ महत्वाची शासकीय कार्यालयं असलेल्या इमारतीच्या आवारातच स्फोटकं सापडल्यामुळं एकच खळबळ उडाली. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरातील या इमारतीमध्ये पोलीस उपायुक्त कार्यालय, निवडणूक कार्यालय आणि प्रांत कार्यालय आहे. अंबरनाथ तालुक्यातील वसाद गावात राहणा-या ३ शेतकरी महिला जमिनीच्या वादाप्रकरणी प्रांत कार्यालयामध्ये आल्या होती. या महिला ज्या रिक्षातून आल्या होत्या त्याच रिक्षात स्फोटकं आढळली आहेत. त्यामुळं या तीन महिला आणि रिक्षा चालकाला फसवण्यासाठी ही स्फोटकं रिक्षामध्ये ठेवल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.
