उद्या म्हणजे शुक्रवारी उत्तररात्री ३ वाजून ५२ मिनिटांनी सूर्य सायन मकर राशीत प्रवेश करत आहे त्यामुळं उत्तरायणारंभ होत असून शिशिर ऋतूचाही प्रारंभ होत आहे. उद्या दिनमान सर्वात लहान म्हणजे १० तास ५७ मिनिटांचं असून रात्र सर्वात मोठी म्हणजे १३ तास ३ मिनिटांची असणार आहे. उद्यापासून दिनमान वाढत जाणार असल्याचं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. पूर्वी आपण चैत्र-वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ-आषाढ ग्रीष्म ऋतू असे पाठ करत होतो. पण हे चुकीचं आहे. ऋतू हे चांद्र महिन्यांप्रमाणे होत नसतात. ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. सूर्य ज्या दिवशी सायन मीन राशीत प्रवेश करतो त्यावेळी वसंत ऋतूचा प्रारंभ होतो. दरवर्षी २१ मार्च आणि २३ सप्टेंबर या दिवशी सूर्य विषुववृत्तावर असल्यामुळे दिनमान आणि रात्रीमान समान असतं. २१ जून रोजी दिनमान मोठे म्हणजे १३ तास १४ मिनिटं तर रात्र सर्वात लहान म्हणजे १० तास ४६ मिनिटांची असते असं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.
