इंडियन हॉलिडे पॅकेजेस या पर्यटन कंपनीचे बोगस ई-मेल आयडी तयार करून एक महिला फसवणूक करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मलेशिया आणि चारधाम यात्रेच्या नावाखाली या महिलेनं साडेतीन लाखांना गंडा घातल्याची तक्रार मुंब्र्यातील डॉ. संतोष जोशी यांनी पोलीसांकडे केली आहे. विशेष म्हणजे आपल्याच पैशाची मागणी करणा-या डॉ. जोशी यांना या महिलेनं दाऊद गँगच्या नावानं जीवे ठार मारण्याची धमकीही दिली आहे. यास्मीन नाईक असं फसवणूक करणा-या या महिलेचं नाव आहे. ही महिला संतोष जोशी यांच्या मुंब्र्यातील आयकॉन रूग्णालयामध्ये उपचार घेत होती. आपण इंडियन हॉलिडे पॅकेजेस या कंपनीत कामाला असून तेथील सवलतीच्या दरातील टूर पॅकेजची माहिती तिने डॉ. जोशी यांना दिली होती. ही पॅकेज स्वस्त असल्यानं जोशी यांनी ८४ हजार रूपये देत मलेशिया टूरचे बुकींग केले होते. पैसे मिळाल्याचा ई-मेलही कंपनीकडून आल्यानं जोशी निर्धास्त होते. त्यानंतर यास्मीननं त्यांना कुटुंबासह चारधाम यात्रेचे बुकींग करण्यासाठी तगादा लावला होता. मात्र पैसे घेतल्यानंतरही मलेशिया टूर्सचे नियोजन केले जात नव्हते. जोशी यांनी तगादा लावल्यामुळं यास्मीन नाईकनं मलेशियन एअरलाईन्सची तिकिटं जोशी यांना पाठवली मात्र ही तिकिटं बोगस असल्याचं जोशी यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळं हॉलिडे पॅकेजेस कंपनीकडे ई-मेलद्वारे विचारणा केली असता यास्मीन नाईक या कंपनीत काम करत नसल्याचं उत्तर त्यांना देण्यात आलं. त्यामुळं दोन टूरसाठी दिलेले २ लाख ९० हजार रूपये परत न दिल्यास पोलीसांकडे तक्रार करण्याचा इशारा जोशी यांनी दिला होता. यास्मीननं काही दिवसांनी जोशी यांना सव्वा तीन लाखांचा धनादेश दिला मात्र तोही वटला नाही. याबद्दल यास्मीनला विचारणा केली असता यास्मीनचा पती अकलुद्दीन यानं डॉ. जोशी यांना ठार मारण्याची धमकी दिली तर एका अनोळखी व्यक्तीनं दाऊदची माणसं असल्याचं सांगत यास्मीनला त्रास दिला म्हणून ५ लाखांची खंडणी मागत जोशी यांना धमकावल्याचंही जोशी यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. यास्मीननं फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तरी तिला अटक होत नसल्यानं फसवणुकीचं सत्र सुरूच आहे.
