ठाणे महापालिका आयोजित सेलिब्रिटी क्रिकेट लिगमध्ये खतरनाक मुळशी संघानं पराक्रमी पुणे संघावर विजय मिळवत महाराष्ट्र सेलिब्रिटी क्रिकेट लिगच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं तर प्रदर्शनीय सामन्यात महापालिका आयुक्तांनी नाबाद ४० धावांची धडाकेबाज खेळी करत अस्सल ठाणेकर संघाला विजय मिळवून देत मॅन ऑफ द मॅच हा किताबही पटकावला. महाराष्ट्र सेलिब्रिटी क्रिकेट लिगमध्ये झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात कलाकारांसोबत महापालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखालील अस्सल ठाणेकर या संघानं बाणेदार ठाणे या कलाकारांच्या संघावर विजय मिळवला. अस्सल ठाणेकर संघात महापालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखाली खासदार श्रीकांत शिंदे, अभिजित पानसे, नजीब मुल्ला यांच्यासह महापालिका अधिकारी सहभागी झाले होते. अस्सल ठाणेकर संघानं प्रथम फलंदाजी करत १० षटकात ११० धावा केल्या. तर ठाणे बाणेदार संघाला १०२ धावांचं आव्हान १० षटकात पूर्ण करता आले नाही त्यामुळं त्यांचा पराभव झाला. दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात गेले तीन दिवस चाललेल्या महाराष्ट्र सेलिब्रिटी क्रिकेट लिगमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात खतरनाक मुळशी संघानं सौरव गोखलेच्या पराक्रमी पुणे संघावर विजय मिळवला. यावेळी खतरनाक मुळशीच्या उदय पाटील यांना मॅन ऑफ द मॅचसोबतच मॅन ऑफ द सिरिज हे पारितोषिक देण्यात आले. या लिगमध्ये सुरेश शिंदे याची बेस्ट बॅटसमन तर उपेंद्र लिमये याची बेस्ट बॉलर म्हणून निवड करण्यात आली. बेस्ट फिल्डर म्हणून अभिजित पानगे याला गौरवण्यात आलं.
