गृहसंकुलातील अंतर्गत रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद करावा या मागणीकरिता निळकंठ ग्रीन आणि सत्यशंकर रेसिडेन्सी येथील रहिवासी उद्या मोर्चा काढणार आहेत. सत्यशंकर रेसिडेन्सी, स्नो ड्रॉप, निळकंठ ग्रीन, सनफ्लॉवर निळकंठ ग्रीन, फ्रेशियार, फ्लेमिंगो, मेपल निळकंठ ग्रीन आणि इतर गृहसंकुलातील रस्ते महाविद्यालयीन बांधकामासाठी आणि दैनंदिन वापरासाठी महापालिकेनं के. सी. महाविद्यालयाला परवानगी दिली आहे. ज्यावेळी या संस्थांमधील रहिवाशांनी फ्लॅट खरेदी केले तेव्हा निळकंठ गेट नंबर २ ते सत्यशंकर महाविद्यालय आणि सत्यशंकर गेट नंबर २ ते के. सी. कॉलेज असे दोन्ही रस्ते खाजगी मालकीचे असल्याचे विकासकाने सांगितले होते. मात्र त्याने रहिवाशांची फसवणूक केली आहे. या गृहसंकुलांतर्फे काही जागा महापालिकेला लोकोपयोगी कामासाठी देण्यात आली होती. मात्र महापालिकेनं ही जागा के. सी. महाविद्यालयाला विकली असल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. गृहसंकुलातील अंतर्गत रस्त्यांचा सार्वजनिक वाहतुकीसाठी उपयोग करू नये म्हणून रहिवाशांनी आयुक्तांचीही भेट घेतली होती. मात्र तरीही उपयोग झाला नाही. आता महाविद्यालयीन व्यवस्थापकांकडून उलट रहिवाशांनाच धमकावलं जात आहे. या परिसरात सध्या १५०० घरं असून १२ हजारांची वस्ती आहे. महापालिका आयुक्तांनी हे अतिक्रमण दूर करून न्याय द्यावा असं रहिवाशांचं म्हणणं आहे. अंतर्गत रस्ता सार्वजनिक करण्यात आल्यामुळं भविष्यात त्रास होणार आहे. यामुळं सुरक्षितता आणि स्वातंत्र्य धोक्यात आल्याचा आरोप करत हे रहिवासी उद्या मोर्चा काढणार आहेत.
