अंतर्गत जलवाहतुकीच्या दुस-या टप्प्याचा प्रकल्प अहवाल ऑक्टोबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी सल्लागार कंपनीला दिल्या आहेत. अंतर्गत जलवाहतुकीच्या दुस-या टप्प्याचा प्राथमिक अहवाल मेडुला सॉफ्ट टेक्नॉलॉजी या सल्लागार कंपनीच्या मुख्याधिका-यांनी महापालिका आयुक्तांना सादर केला. त्यावेळी या प्रकल्पाचा डीपीआर ऑक्टोबर अखेरपर्यंत सादर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या. अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पांतर्गत वसई, ठाणे, कल्याण या पहिल्या टप्प्याचा ६४५ कोटी रूपयांचा प्रकल्प अहवाल यापूर्वीच मंजूर झाला आहे. दुस-या टप्प्यामध्ये ठाणे ते मुंबई आणि ठाणे ते नवी मुंबई या दोन मार्गांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. अंतर्गत जलवाहतुकीच्या दुस-या टप्प्यात साकेत, कळवा, विटावा, मिठबंदर, ऐरोली, वाशी, ट्रॉम्बे, एलिफंटा, फेरी व्हार्फ ते गेटवे या मार्गाचा समावेश आहे. या टप्प्याचा प्राथमिक अहवाल सादर झाला असून दुस-या टप्प्यासाठी ७१७ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या दुस-या टप्प्याचा प्रकल्प अहवाल २०२० पर्यंत सादर करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र या कामाला गती मिळावी या दृष्टीकोनातून दुस-या टप्प्याचा प्रकल्प अहवाल २०१९ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.
