चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आवाहन

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केलं आहे. अरबी समुद्रामध्ये पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळामध्ये रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व संबंधित विभाग, मच्छिमार आणि नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी कळविले आहे. बिपरजोय चक्रीवादळ तसेच अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यासंदर्भात नागरिकांनी तसेच मच्छिमार बांधवांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी प्राधिकरणाकडून महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व विभागांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत. दुरध्वनी क्रमांक सुरु आहेत याची खात्री करावी. आपत्कालीन प्रसंगी तत्काळ प्रतिसाद द्यावा. मासेमारी करण्यासाठी गेलेल्या नौकांना किनाऱ्यावर तात्काळ परत बोलाविण्यात यावे, पुढील सूचना मिळेपर्यंत मासेमारीसाठी परवाना देण्यात येवू नये, तसेच मच्छिमारांना खोल समुद्रात जाण्यास मनाई करण्यात यावी, मासेमारी जेट्टींवर सूचनां फलक लावण्यात यावेत. बोटीमधून प्रवासी वाहतूक बंद करण्यात यावी. पुढील सूचनां मिळेपर्यंत प्रवासी वाहतूक थांबविण्यात यावी. प्रवासी बोटीवर जीवनावश्यक लाईफ जॅकेटस्, बोयाज उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी, सर्व समुद्र किनाऱ्यावरील वॉटरस्पोर्टस उपक्रम थांबविण्यात यावेत, पर्यटकांना/नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा, चक्रीवादळामुळे झाडे पडल्यास ती हटविण्यासाठीची आवश्यक साधने तत्पर उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी, तसेच मोबाईल टॉवरचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास टॉवरच्या ठिकाणी विद्युत जनरेटर उपलब्ध करावेत. विद्युत पुरवठ्याबाबतचे नियोजन विद्युत वितरण कंपनीने करावे. रुग्णवाहिका, आपत्कालीन वैद्यकिय सुविधा तत्पर ठेवाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सखल भागात अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असून त्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. चक्रीवादळ आणि मान्सुन कालावधीत पुरपरिस्थिती निर्माण होवुन रेल्वे रुळांवर पाणी आल्यामूळे वाहतुक विस्कळीत होत असल्यास आवश्यक उपाययोजना प्राधान्याने कराव्यात तसेच जिल्हा प्रशासनाशी आवश्यक समन्वय ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असल्याचे परदेशी यांनी कळविले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading