गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येवर नयनरम्य दीपोत्सव आणि आकर्षक रांगोळ्यांच्या रंगोत्सवानं नववर्षाचं स्वागत

ठाणेकरांनी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येवर नयनरम्य दीपोत्सव आणि आकर्षक रांगोळ्यांच्या रंगोत्सवानं नववर्षाचं स्वागत केलं. मासुंदा तलावासभोवती साजरा झालेला आगळा वेगळा दीपोत्सव पाहण्यासाठी स्त्री-पुरूषांनी गर्दी केली होती. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलावाभोवती नयनरम्य दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कालही असा नयनरम्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रतिकात्मक गंगेची आरती करण्यात आली. मासुंदा तलावातील महादेवाच्या पिंडीजवळ महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत केल्यानंतर मशालीनं इशारा करण्यात आला आणि मासुंदा तलावाभोवतीचं वातावरण हजारो पणत्यांच्या मंगल प्रकाशानं उजळून निघालं. तलावाच्या सभोवती देखील पणत्या आणि मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या. तलावाच्या मध्यभागी गोलाकार तेवत असलेल्या दिव्याचं पाण्यात दिसणारं प्रतिबिंब आणि तांबड्या, पिवळ्या, निळ्या, केशरी रंगाच्या रंगोत्सवाची उधळण आकाशात पाहताना ठाणेकर आनंदात न्हाऊन निघाले. मासुंदा तलावाप्रमाणेच ठाण्यात विविध ठिकाणी असाच देखणा आणि नयनरम्य रोषणाईचा दीपोत्सव साजरा झाला. ठाणे शहरातील काही देवळांमधूनही मोठ्या संख्येनं पणत्या लावून दीपोत्सवानं नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. दिव्यांच्या रोषणाईनं तेजोमय झालेलं ठाणे पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक घराबाहेर पडले होते. गुढीपाडव्यानिमित्त खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेले ठाणेकर, दीपोत्सवासाठी जाणारे ठाणेकर यामुळं काल ठाण्याच्या विविध भागात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसत होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading