१७व्या शतकातील ११ तोफा आता मोकळा श्वास घेणार

ठाण्याच्या खाडीकिनारी असलेल्या ऐतिहासिक तोफांचं लवकरच संवर्धन होणार असून पर्यटकांना पाहण्यासाठी त्या दर्शनीय भागावर ठेवण्यात येणार आहे. पुरातत्व विभाग, ठाणे महापालिका, मेरीटाईम बोर्ड आणि दुर्गवीर प्रतिष्ठाननं यासाठी पुढाकार घेतला आहे. शासनाच्या गडसंवर्धन समितीनं आज या तोफांची पाहणी केली. ठाण्यातील मध्यवर्ती कारागृह हा सुध्दा इतिहासाचाच एक भाग आहे. या किल्ल्याच्या संरक्षणासाठी ४० तोफा तैनात करण्यात आल्या होत्या असे जाणकार सांगतात. मात्र सद्यस्थितीत या तोफांची माती होऊ लागली आहे. सध्या येथे अवघ्या ११ तोफा मातीमध्ये उलट्या गाडलेल्या मिळाल्या आहेत. सोळाव्या शतकात पोर्तुगीज आणि अरेबियन लोक या बंदराचा व्यवसायासाठी वापर करत होते. व्यापारी जहाजं बांधण्यासाठी काही तोफांचा वापर केला जात असे. तोफा अर्ध्या जमिनीत गाडल्या गेल्या असल्यामुळे त्यांची माती होऊ लागली आहे त्यामुळे गडसंवर्धन समितीनं पुढाकार घेऊन या तोफांचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरातत्व विभागाच्या वतीनं या तोफा जमिनीबाहेर काढून मोकळ्या जागेत ठेवल्या जाणार आहेत. गडसंवर्धन समितीचे सदस्य सचिन जोशी, कोळीवाडा जमात ट्रस्टचे सुबोध ठाणेकर, दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या पाहणीच्या वेळी उपस्थित होते. या तोफा काढून त्या खाडीकिनारीच मोकळ्या जागी सुस्थितीत ठेवल्या जाणार आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: