सिमेंट ब्लॉकसाठी ट्रकचालकाची हत्या करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा छडा लावण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश

सिमेंट ब्लॉकसाठी ट्रकचालकाची हत्या करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा छडा लावण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हि घटना 26 फेब्रुवारी रोजी घडली होती.कुठलाही दुवा नसताना पोलिसांनी महामार्गावरील सीसी टीव्ही फुटेज तपासून सर्व आरोपीना अटक केली असून न्यायालयाने सर्वांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ.शिवाजी राठोड यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक बेवारस मृतदेह रिकाम्या ट्रकमध्ये आढळला होता.तपासात हा मृतदेह ट्रकचालक सुभाष यादवचा असल्याचे उघड झाले.26 फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी कुठलेही धागेदोरे नसताना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या पथकाने गुजरात सीमा ते भिवंडीतील घटनास्थळापर्यंतच्या महामार्गावरील उपलब्ध सीसी टीव्ही फुटेज तपासून या गुन्ह्याचे बिंग फोडले.एका ठिकाणच्या सीसी टीव्ही फुटेजमध्ये मृत ट्रकचालक यादवऐवजी दुसराच कुणीतरी ट्रक चालवत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी सर्वप्रथम त्याच्या मुसक्या आवळल्या.मोहम्मद अजमल वसीअहमद शेख या ट्रकचालकाला अटक करण्यात आली.त्याच्या चौकशीत मास्टरमाईंड भिवंडीतील बांधकाम व्यावसायिक इम्रान अलीलखान यांच्यासह मोहम्मद शाकीर शेख,जहाँबेज खान आणि कैफ अहमद शेख या चौघांना अटक करण्यात आली.आरोपींनी दिलेल्या कबुलीत,इम्रान याने काही दिवसापूर्वी सिमेंट ब्लॉकसाठी 10 हजार रुपये एडव्हान्स दिले होते.त्या मालाचा पुरवठा करण्यासाठी त्याने तगादा लावला असल्याने हा दरोड्याचा कट रचल्याचे सांगितले.यातील मोह.अजमल या ट्रकचालकाने गुजरात मधील वापीहुन खोपोलीकडे सिमेंट ब्लॉक भरून निघालेल्या यादव याला तलासरीनजीक गाठून लिफ्ट मागितली.मृतक आणि अजमल हे एकमेकांचे परिचित निघाल्याने पुढे अजमलचे इतर साथीदारहि ट्रकमध्ये बसले. महामार्गावर लघुशंकेचे निमित्त करून या टोळीने ट्रकचालक यादव याची लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने हत्या केली, मृतदेह क्लिनरच्या जागी ठेवून मध्येच ट्रकमधील सिमेंट ब्लॉक उतरवले.तसेच,रिकामा ट्रक भिवंडीतील रस्त्यावर बेवारस सोडून पळ काढला होता.मात्र,पोलिसांनी सिमेंट ब्लॉकसाठी ट्रकचालकाची हत्या करणाऱ्या या टोळीचा छडा लावून पाचही जणांना अटक केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading