कळवा-मुंब्रा-शीळ मधील वीज ग्राहकांनी तीव्र विरोध दाखवल्यानंतरही या विभागाचं खाजगीकरण झालं असून टोरेंट पॉवर कंपनीला या परिसरात वीज वितरणाचे हक्क पुढील २० वर्षासाठी देण्यात आले आहेत. कळवा-मुंब्रा आणि शीळ या परिसरातून मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत असल्यामुळं महावितरणला पुरेसं उत्पन्न मिळत नव्हतं. त्यातच वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्यामुळे या परिसरातील ग्राहकही महावितरणच्या कारभारावर नाराज होते. या परिसरातील वीज वितरणाचं खाजगीकरण केलं जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. तेव्हापासून या खाजगीकरणाला विरोध केला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या खाजगीकरणाला तीव्र विरोध दर्शवून असं खाजगीकरण झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. मात्र खाजगीकरणाला होणारा विरोध डावलून महावितरणनं शीळ, मुंब्रा आणि कळवा या परिसराच्या वीज वितरणाचं काम टोरेंट पॉवर कंपनीला पुढील २० वर्षासाठी दिलं आहे. सध्या या परिसरात सुमारे २ लाख १५ हजार वीज ग्राहक आहेत. टोरेंट पॉवर कंपनी ही या परिसरातील वीज वितरणाच्या साधनसामुग्रीचा दर्जा सुधारण्याबरोबरच वीज पुरवठ्यामध्येही सातत्य आणि दर्जा राखण्याचं काम करेल. भिवंडीमध्येही गेली अनेक वर्ष वीज वितरणाचं खाजगीकरण करण्यात आलं असून भिवंडीमध्येही टोरेंट पॉवर कंपनीकडेच हे काम आहे. मात्र कंपनीच्या एकूण कारभाराबाबत भिवंडीमध्ये नाराजी असून याबाबत अनेकदा आंदोलनं झाली आहेत.