विविधरंगी आकाशकंदिलांनी सजल्या घरांच्या खिडक्या

आकाशकंदिल ही खासकरून दिवाळी सणाची देणगी समजली जाते. दिवाळी हा दिव्यांचा सण असून घराच्या बाहेर दारासमोर असणारा आकाशकंदिल त्या घराला आणि आसमंताला रंगीबेरंगी प्रकाशाची शोभा देतो.यावर्षी बाजारात निरनिराळ्या आकाराच्या आणि रंगाच्या देखण्या आकाशकंदिलांनी गर्दी केली आहे. यंदा बाजारात फॅन्सी आकाशकंदिल आले आहेत. हे आकाशकंदिल बाजारामध्ये आकारमानानुसार अडीचशे रूपयापासून हजार रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. नेहमीच्या आकाशकंदिलापेक्षा वेगळ्या आकाराचे आणि वेगळ्या धाटणीचे हे कंदिल सध्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. बाजारामध्ये पारंपरिक म्हणजे अष्टकोनी आकाशकंदिलांची चलती आहे. सध्या पर्यावरण रक्षणाचे दिवस असून पर्यावरण प्रेमी कंदिल बाजारात लक्षवेधक ठरले आहेत. हे कंदिल कापडापासून तयार करण्यात आले असून १०० रूपयांपासून ८०० रूपयांपर्यंत हे कंदिल उपलब्ध आहेत. कंदिलाच्या आकारमानानुसार त्याची किंमत आहे. कंदिलांचे नानाविध आकार आणि रंग सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. त्रिकोणी, षटकोनी, चौकोनी, गोल, आयताकृती इतकंच नाही तर अगदी पणतीसारखाही कंदिल बाजारात पहायला मिळत आहे. आकर्षक रंग, सुंदर आकार, नवनवीन कल्पना अशा आकाशकंदिलांनी बाजार भरून गेला आहे. असं असलं तरी पारंपरिक चांदणी आणि षटकोनी आकाराच्या झिरमिळ्या असलेल्या आकाशकंदिलांचं महत्व आजही टिकून आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: