वाहतूक विषयक जनजागृती करणा-या रोबोटचं अनावरण

ठाणे वाहतूक शाखेनं वाहतूक विषयक जनजागृतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून आज वाहतूक विषयक जनजागृती करणा-या रोबोटचं अनावरण वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या हस्ते करण्यात आलं. हा रोबोट पुढील १० दिवस शहरामध्ये शाळा, महाविद्यालयं, मॉल आणि जंक्शन येथे जनजागृती करणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या निर्देशानुसार ३० वा रस्ता सुरक्षा अभियान ४ ते १० फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे. यावेळी सडक सुरक्षा जीवन रक्षा हे ब्रीदवाक्य ठेवण्यात आलं आहे. ठाणे वाहतूक विभागातर्फे अडीचशे शाळा आणि ४० महाविद्यालयांमध्ये रांगोळी, पेंटींग, स्लोगन, निबंध, वक्तृत्व, डान्स आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यातील १२ हजार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवलं जाणार आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यावर होणारा दंड आणि शिक्षा याबाबत माहिती देणारी पत्रकं रेल्वे स्थानक, मॉल, जंक्शन आणि महाविद्यालय परिसरात वाटली जाणार आहेत. ठाणे वाहतूक शाखेमध्ये ५६ पोलीस अधिकारी आणि ६८२ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत.

Leave a Comment