वस्तू आणि सेवाकराबाबत व्यापारी, व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांना येणा-या अडचणी आणि विविध ई-सेवा उपलब्ध करून देण्यात मदत करण्यासाठी वस्तू आणि सेवाकर कार्यालयानं अद्ययावत मदत केंद्र सुरू केलं आहे. हे केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील वस्तू आणि सेवाकर कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलं असून त्याचं उद्घाटन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांच्या हस्ते झालं. वस्तू आणि सेवा कर अधिनियमानुसार करदात्यांकरिता ई-सेवा उपलब्ध केल्या आहेत. ई-सेवा नोंदणी अर्ज करणे, विवरणपत्र दाखल करणे, परताव्यासाठी अर्ज करणे अशा विविध सेवा यात आहेत. यामध्ये येणा-या अडचणी या सेवा केंद्राद्वारे सोडवण्यात येतील असं अप्पर राज्य कर आयुक्त सुमेरकुमार काले यांनी सांगितलं. वस्तू आणि सेवा कर हा महत्वाचा विभाग असून या कार्यालयास सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं जिल्हाधिका-यांनी सांगितलं तर आपण मूळ विक्रीकर विभागातील अधिकारी असून हा आपल्या परिवाराचाच कार्यक्रम असल्याचं सांगून या सेवा केंद्राच्या उभारणीबाबत कौतुक केलं.
